मी काही लेखक नाही. तत्वज्ञानी तर अजिबात नाही. लहानपणापासून माझ्या आजीने मला पारमार्थिक पुस्तक वाचायला दिले. त्या वेळेला अस वाटायचं कि हे किती कंटाळवाण आहे आणि मला ह्याचा काय फायदा होईल? आज जेव्हा मी ethical hacking किंवा cybersecurity क्षेत्रात काम करतो तर मी अगदी खरं सांगतो जे काही मी वाचलं त्याचा मला माझ्या क्षेत्रात काम करताना फायदा होतो आहे. आज मी महाभारत ह्या विषयावर लिहिण्याच धाडस करतो आहे. खर तर आधी मी योगवशिष्ठ ह्या ग्रंथावर लिहिणार होतो पण मग असा विचार केला कि हा माझा पहिला प्रयत्न आहे तर मग महाभारतावर लिहाव.

सहज मनात आल कि महाभारत हा ग्रंथ आपल्याला आयुष्यात कसा जगावं हे शिकवतो. हा एक असा ग्रंथ आहे कि ज्यात तुम्हाला सगळं काही शिकता येत. काही दिवसांपूर्वी सहज बसलो असताना एक विचार डोक्यात आला कि भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात आणि अर्थात गीतेतून जे सांगितलं आहे ते तर cybersecurity क्षेत्रात पण लागू पडत.

म्हणजे महाभारताकडे जर आपण एका ethical hacker च्या डोळ्यांनी पाहिलं, तर जाणवतं की महाभारत हे केवळ धर्मयुद्धाचं आख्यान नाही, तर हा ग्रंथ जगातला पहिला सखोल cybersecurity चा महाग्रंथ आहे. तुम्ही म्हणाल कसा?

तर विचार करा. महाभारतातल प्रत्येक पात्र हे एक वेगळं तत्त्व, प्रत्येक युक्ती हा एक डाव. आणि या सर्वाच्या केंद्रस्थानी उभे आहेत भगवान श्रीकृष्ण. त्यांचा विचार म्हणजे प्रकाश, त्यांची दूरदृष्टी म्हणजे मार्ग आणि त्यांची शांत बुद्धी म्हणजे संपूर्ण cybersecurity .

पांडव म्हणजे आजच्या काळातले रक्षणकर्ते त्यांना आम्ही आमच्या भाषेत defenders म्हणतो. युधिष्ठिर म्हणजे governence and compliance. नेहमी तंत्वानी आणि सत्याच्या बाजूनी चालणारा जशी एकादी कंपनी हि ISO आणि NIST frameworks ला बांधील असते अगदी तसाच युधिष्ठिर होता. म्हणून त्याला धर्मराज म्हणायचे. जसा एखादा business नियमांच्या चौकटीत बांधलेला असतो, तसा तो धर्माला बांधलेला. पण हीच compliance ची कठोरता कधी कधी cybersecurity क्षेत्रांत कमकुवत ठरते.

भीम म्हणजे incident response. शत्रूने firewall भेदल्या तरी एका प्रहारात संकटाचा नाश करणारा. अर्जुन म्हणजे कौशल्याचा बाण, तो एथिकल हॅकर आहे. hack करण्याची क्षमता असूनही तो नेहमी संमती आणि जबाबदारीच्या चौकटीत लढला . नकुल आणि सहदेव हे शांत पण अतिशय आवश्यक. नकूल म्हणजे endpoint defence म्हणजे अंतर्गत संरक्षण, तर सहदेव म्हणजे धोका ओळखून सावध करणारा म्हणजेच आमच्या भाषेत त्याला threat intelligence म्हणतात. सांगायचं तात्पर्य हेच कि प्रत्येक पात्र हे cybersecurity मधलं एक उत्तम टूल.

पण हे सारे कृष्णाशिवाय निष्फळ ठरले असते. भगवान कृष्णाने कधी शस्त्र हातात घेतलं नाही, पण युद्ध त्यांनीच जिंकलं. कारण तो होता सेनानी नव्हे तर सेनाधीश आमच्या भाषेत खरा CISO . रथाच्या दोऱ्या धरून रणांगणाच्या प्रत्येक श्वासावर त्याचं अधिराज्य. कृष्ण म्हणजे शाश्वत अविश्वास (Zero Trust). नेहमी पडताळणी, नेहमी पुढच्या पावलाचा विचार. तो deception technology उभी करतो, शत्रूला फसवतो, मानसिक डावपेचांनी (honeypot ) त्यांना थकवतो. गीतेंतील त्याचा उपदेश म्हणजे सर्वोच्च प्रशिक्षण, जे थकलेल्या defenders ला भीतीतून बाहेर काढतं आणि लढायला शिकवतं.

नियम मोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी नियम पण मोडले कारण महाभारत हे एक धर्मयुद्ध होता. भीमाला दुर्योधनाच्या मांडीत वार करायला प्रवृत्त करणं किंवा अर्जुनाला शिखंडीसमोर नेऊन भीष्माला हरवायला लावणं, हे सर्व त्या एका उद्दिष्टासाठी होतं की संपूर्ण धर्माचा बचाव व्हावा.

एथिकल हॅकर जसा परंपरा मोडूनही व्यापक सुरक्षा जपतो, तसा कृष्ण होता. कारण कौरव होते आजच्या जगातले Threat Actors , ransomware group , advanced persistent threats म्हणजे विचार करा दुर्योधन म्हणजे APT . दु:शासन म्हणजे अपमानातून मनोधैर्य खच्ची करणारा ransomware . जसा ransomware group तुमचा डेटा एनक्रिप्ट करतो आणि पब्लिकली तुम्हाला एक्सपोस करतो. दु:शासन अगदी तसाच.

कर्ण म्हणजे insider threat सामर्थ्य असूनही चुकीच्या निष्ठेत अडकलेला. आणि त्यामागे होता शकुनी. फसवणुकीचा मूळ जनक. पास्यांच्या खेळातून त्याने संपूर्ण राज्याला एका चुकीच्या पावलावर लोटून उध्वस्त केलं. कौरवांची प्रचंड सेना म्हणजे botnet , स्वतंत्रपणे निर्बल पण एकत्र आली प्रलयंकारी. जशे bots तशी कौरवसेना.

भीष्म म्हणजे जुनी फायरवॉल. कणखर पण बायपास होण्याजोगी. द्रोण म्हणजे outdated devices आणि ऑपरेटिंग सिस्टिम प्रणाली. बलवान पण शोषण झाल्यावर उघडी. कृपाचार्य म्हणजे कागदी मार्गदर्शन. उपयुक्त पण अपुरं. विदुर म्हणजे दूरदृष्टी असलेला रक्षक. पण त्याचा आवाज नेहमी आंधळ्या नेत्यांकडून दाबला जातो. धृतराष्ट्र म्हणजे वास्तवाकडे आंधळं व्यवस्थापन. गांधारी म्हणजे डोळे स्वतः बांधून घेणारी संस्था.

द्रौपदी म्हणजे डेटा. मुकुटमणी ज्यासाठी सगळा संघर्ष. अभिमन्यू म्हणजे तरुण analyst. प्रतिभावान पण अपूर्ण प्रशिक्षणामुळे एकटा पडलेला . घटोत्कच म्हणजे honeypot . स्वतः बलिदान देऊन शत्रूला थकवणारा. सात्यकी म्हणजे सतत शत्रूला चाचपडणारा Red team योद्धा. विराट म्हणजे third party रक्षक. विश्वास ठेवल्यास मित्र, पण संभाव्य कमकुवत दुवा.

अश्वत्थामा म्हणजे zero day exploit , अनपेक्षित क्षणी attack करणारा . जयद्रथ म्हणजे चुकीच्या क्षणी झालेला अडथळा. कृतवर्मा म्हणजे बाहेरून आलेला धोका. शल्य म्हणजे मुखवट्याच्या आडून मनोधैर्य तोडणारा विश्वासघातकी. कुंती म्हणजे जागरूकतेचं बीज. सुभद्रा म्हणजे सुरक्षित संवाद. उत्तरा म्हणजे जतन केलेलं भविष्य, आपत्तीपश्चातही जिवंत ठेवलेलं. आणि सगळं झाल्यावर परिक्षित म्हणजे पुनर्जन्म, ज्याला आम्ही आमच्या भाषेत रिकव्हरी म्हणतो.

या सर्वाच्या केंद्रस्थानी होता कृष्ण. रणांगणावर काळोख झालं तरी दिशा दाखवणारा. इतर हरवले असताना शांत राहून रणनीती रचणारा. सहनशीलतेचं मूर्तिमंत रूप. महाभारतात कृष्ण केवळ पात्र नाही. तोच नेतृत्वाचं शाश्वत तत्त्व आहे. कुरुक्षेत्र हे पहिलं सायबर प्रशिक्षण मैदान होतं. इथे होत reconnaissance, अंतर्गत धोके, सप्लाय चैन अटॅक, social engineering . धडा मात्र एकच. सायबरसुरक्षा धर्मासारखी आहे. tools मध्ये नव्हे, तर माणसांमध्ये आहे. जागरूकतेत आहे. दूरदृष्टीत आहे. योग्य निवडीत आहे. एक दुर्लक्षित विदुर, एक आंधळी गांधारी, एक चुकीच्या निष्ठेत अडकलेला कर्ण आणि संपूर्ण व्यवस्था ढासळते. पण जर एक कृष्ण असला, तर रक्षणकर्त्यांचा विजय निश्चित होतो. आजचा प्रत्येक सुरक्षा प्रमुख आपल्या कुरुक्षेत्रावर उभा आहे. प्रश्न फक्त इतकाच. आपण धृतराष्ट्रासारखे आंधळे आहात का, की आपल्या कृष्णाचा आवाज ऐकता आहात?

नोट : ह्र्स्व आणि दीर्घ चुका क्षमा करा.